श्रीगोंद्यात संत शेख महंमद महाराज समाधी मंदिरासाठी पुन्हा संघर्ष तेजीत; २४ जुलैपासून प्रत्येक गुरुवारी उपोषणाचा निर्णय..

दिनांक १७ जुलै २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सद्गुरु संत शेख महंमद महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्वाराला अडथळा ठरणाऱ्या वक्फ बोर्डाच्या नोंदणीविरोधात आता जनआंदोलनाचे स्वरूप पुन्हा तीव्र होणार आहे.

या संदर्भात गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ पासून सद्गुरु संत श्री शेख महंमद महाराज समाधी मंदिरात उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती संत शेख महंमद महाराज समाधी मंदिर निर्माण कृती समितीचे नेते घनश्याम शेलार यांनी दिली.

संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंदा व तालुक्याचे आराध्य दैवत असून त्यांनी भागवत धर्माची दीक्षा घेत जीवनभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. पंढरीच्या वाऱ्या करत त्यांनी वारकरी परंपरेचे पालन करत सपत्नी संजीवन समाधी घेतली. अशा प्रकारे समाधी घेतलेले ते एकमेव संत आहेत. त्यामुळे त्यांचे समाधीस्थळ हे मंदिर म्हणून ओळखले जाणे भाविक भक्तांच्या श्रद्धेचा भाग आहे.

मात्र, १९५३ साली “श्री शेख महंमद बुवा देवस्थान” या नावाने धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद असलेले देवस्थान अनधिकृतपणे वक्फ बोर्डाकडे ट्रस्ट म्हणून नोंदवले गेले. यामुळे मंदिराच्या जीर्णोद्वारात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत, कारण वक्फ कायद्यानुसार मज्जिद किंवा दर्गाह नोंद होऊ शकतात, मात्र मंदिर नाही.

या पार्श्वभूमीवर १७ एप्रिल २०२५ रोजी वारकरी संप्रदायातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला होता. ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. माणिक महाराज मोरे व ह.भ.प. जब्बार महाराज शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चाला व्यापारी वर्गाने दोन दिवसांचा बंद ठेवून पाठिंबा दिला होता. त्यानंतर २८ एप्रिल २०२५ रोजी अन्नत्याग आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.

प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितल्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटूनही शासन किंवा प्रशासन पातळीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने “संत शेख महंमद समाधी मंदिर निर्माण कृती समिती” स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने आता प्रत्येक गुरुवारी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्याची सुरुवात गुरुवार, २४ जुलै २०२५ पासून करण्यात येणार आहे.

शेलार यांनी स्पष्ट केले की, समाधी मंदिराचा जीर्णोद्वार, भाविक भक्तांची श्रद्धा आणि संतांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवला जाईल, आणि शासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply