दिनांक १६ जुलै २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेस धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, गावातीलच एका ओळखीच्या पुरुषाने तिचे अश्लील फोटो काढून, ते पती व नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

सदर महिला आपल्या कुटुंबासह सात वर्षांपासून या गावात वास्तव्यास आहे. ती शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते. तिने सांगितले की, आरोपी पुरुषाबरोबर शेतात काम करत असताना त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने महिलेस फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.

८ जानेवारी २०२५ रोजी रात्री पीडित महिला घरात एकटी असताना, आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही तो वेळोवेळी रात्री उशिरा येऊन तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकारात पीडितेची असहमती असूनही आरोपीने जबरदस्ती केली, असे तिचे म्हणणे आहे.

या अत्याचाराबाबत कुणाला काही सांगितल्यास फोटो प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी दिल्याने, पीडित महिला दीर्घकाळ गप्प राहिली. मात्र नुकतेच तिच्या पतीला संशय आल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

श्रीगोंदा पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी देणे, आणि Atrocity कायद्याअंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

स्रोत:(फिर्याद)
