#श्रीगोंदा…भाजप प्रवेश सोहळ्यावर नाराजीचे पडसाद: श्रीगोंद्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी अस्वस्थ, पक्षांतर्गत तणावाची चिन्हं.!

श्रीगोंदा, दिनांक १७ जुलै २०२५:

श्रीगोंदा नगर विधानसभेतील राजकारणाला नवे वळण देणारी एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच मुंबई येथे घडली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण आणि श्रीगोंदा नगर विधानसभेचे आमदार मा.श्री. विक्रम (दादा) बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होईल, असा सूर वरिष्ठ पातळीवरून व्यक्त करण्यात आला. मात्र दुसरीकडे या कार्यक्रमाच्या नियोजनावरून पक्षातील काही निष्ठावंत व जुने पदाधिकारी नाराज झाल्याचे आता स्पष्टपणे समोर येत आहे.

प्रवेश सोहळा १५ जुलै रोजी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला असला तरी, काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी याआधीच बबनराव दादा पाचपुते, प्रतिभा अक्का पाचपुते आणि विद्यमान आमदार विक्रम दादा यांच्याशी संपर्क साधून एका समिक्षा बैठकीची मागणी केली होती. त्यांनी असा कार्यक्रम श्रीगोंद्यातील माऊली निवासस्थानी, ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांच्या शुभहस्ते पार पडावा, अशी विनंती केली होती.

मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करत वरिष्ठांच्या उपस्थितीत थेट मुंबईतच कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे जुने व कार्यक्षम पदाधिकारी, जे पक्षासाठी अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे झटत होते, ते या निर्णयामुळे नाराज झाल्याचे वृत्त आहे.

या नाराजीचा परिणाम येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसून येण्याची शक्यता असून, काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “पक्षात आमची किंमत नसेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.

एकंदर भाजपच्या श्रीगोंदा तालुक्यातील गोटात अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे. ही नाराजी वेळेत दूर न केल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading