श्रीगोंदा (दि. १८ जुलै २०२५) –
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आरोपीला अटक करण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप करत आज मागासवर्गीय संघटनांनी पोलीस उपविभागीय अधिकारी उगले यांना निवेदन दिले.

या निवेदनात संघटनांनी स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरच आरोपीला अटक झाली नाही, तर येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. वसंतराव सकट यांनी माध्यमांशी बोलताना हा इशारा दिला.

सकट म्हणाले, “आरोपी अजूनही मोकाट असणे हेच पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ व भूमिकेचा पुरावा आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणे ‘आम्हाला तेवढेच काम आहे का?’ असे म्हणून कार्यकर्त्यांना कार्यालयातून हाकलून दिले.“

त्याचबरोबर, फिर्यादी महिलेलाच दमदाटी करत, “तुमच्यावरच गुन्हा दाखल करू,” असा सज्जड इशाराही दिला गेला असल्याचे आरोप आहेत. या प्रकारामुळे मागासवर्गीय संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

संघटनांचे म्हणणे आहे की, शिंदे यांचा मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे. त्यांच्या विरोधातील नाराजी मागील सेवास्थळीही व्यक्त झाली होती. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्यांनी भिल्ल समाजाच्या एका अत्याचार प्रकरणात देखील पीडितांशी अन्यायकारक वागणूक दिल्याचा आरोप होता. त्या प्रकरणामुळेच त्यांची तत्काळ बदली श्रीगोंदा येथे करण्यात आली होती.

श्रीगोंद्यातील स्थानिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आता प्रश्न उपस्थित करत आहेत की, “आरोपी अटक करण्यासाठी जर आंदोलने करावी लागत असतील, तर मग पोलीस यंत्रणाच काय करत आहे?“
स्रोत:(अधिकृत माहिती)
