#श्रीगोंदा.. “सिस्पे कंपनी कोसळली तर मतदारसंघ दहा वर्षे मागे जाईल” – आमदार विक्रम पाचपुते यांची विधानसभेत गंभीर चिंता..

श्रीगोंदा, दिनांक १८ जुलै २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील सिस्पे फ्रॉड प्रकरणाची धग आता विधानसभेपर्यंत पोहोचली असून, श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. विक्रम बबनराव पाचपुते यांनी आज सभागृहात या गंभीर प्रकरणावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

सभागृहात बोलताना आमदार पाचपुते म्हणाले, “सिस्पे नावाचा एक प्रकार आमच्या मतदारसंघात गेल्या काही काळापासून सुरू आहे. अनेक नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी, या योजनेत शेकडो कोटी रुपये गुंतवले आहेत. मात्र सध्या या योजनेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जर सिस्पे कंपनी कोसळली, तर माझा संपूर्ण मतदारसंघ दहा वर्षे मागे जाईल.”

शेतकरी वर्ग, अल्पबचतदार आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचे पैसे या कंपनीत अडकले असून, त्यांच्या आयुष्याची पुंजी पणाला लागली आहे. अनेक गुंतवणूकदार सध्या आर्थिक संकटात सापडले असून, या परिस्थितीने आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता अधिक खोल झाल्या आहेत, अशी भावनिक व्यथा आमदार पाचपुते यांनी मांडली.

या प्रकरणावर सरकारने तातडीने लक्ष घालावे, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच भविष्यात अशा आर्थिक फसवणुकीला आळा बसावा यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार पाचपुते यांनी हा मुद्दा सभागृहात उठवल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पीडित गुंतवणूकदार व जनतेमध्ये समाधान व्यक्त होत असून, त्यांनी आमदार पाचपुते यांचे आभार मानले आहेत.

तालुक्यात सिस्पे घोटाळ्यामुळे निर्माण झालेली भीती आणि आर्थिक अस्थिरतेची स्थिती पाहता, हा मुद्दा विधानसभेत मांडून त्यांनी जनतेच्या भावना आणि दुःख सरकारपुढे प्रभावीपणे पोहोचवले, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

स्रोत:(व्हायरल व्हिडिओ)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading