श्रीगोंदा, दि.८ जुलै २०२५ (श्रीगोंदा, अहिल्यानगर):
इन्फिनाईट बिकन (INFINITE BEACON) या खासगी कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ७३,५०,०००/- रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा पोलीसांनी याप्रकरणी महाराष्ट्र व बाहेरगावातील १२ आरोपींविरुद्ध BNS कलम 316(2), 318(2), 318(4), 3(5) MPID कायदा 3 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १५ सप्टेंबर २०२४ ते १५ जून २०२५ दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव परिसरात वेळोवेळी त्यांना आणि इतर साक्षीदारांना “महिन्याला ६ ते ८ टक्के परतावा” देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी संगनमत करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करवून घेतली.

या प्रकरणात खालील आरोपींचा समावेश आहे:
- नवनाथ जगन्नाथ औताडे (रा. फलवानी, जि. सोलापूर)
- अगस्त मिश्रा (रा. नांदेड सिटी, पुणे)
- राहुल शामराव काळोखे (रा. दिघी, पुणे)
- गौरव देविदास सुखदिवे (रा. अकोला)
- प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी (रा. नांदेड सिटी, पुणे)
- सचिन लक्ष्मण खडतरे (पत्ता अज्ञात)
- ययाती मिश्रा (पूर्ण माहिती नाही)
- शुभम नवनाथ औताडे (रा. सोलापूर)
- सुवर्णा नवनाथ औताडे (रा. सोलापूर)
- रंगनाथ तुळशीराम गलांडे (रा. देवुळगाव गलांडे, श्रीगोंदा)
- अनिल झुंबर दरेकर
- संदीप संपत दरेकर (दोन्ही रा. हिडरगाव, श्रीगोंदा)

फिर्यादीने केलेल्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. संजय वाघमारे करत आहेत.

या प्रकरणात अद्याप कोणतीही जप्ती करण्यात आलेली नाही, मात्र आर्थिक गुन्हेगारी शाखेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळवण्यासाठी पुढील कार्यवाही केली जात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या फसवणुकीमध्ये अजूनही काही अधिक गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा पोलिसांनी अशा फसवणुकीस बळी पडलेल्या व्यक्तींनी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
