श्रीगोंदा, दि. ८ जुलै २०२५:
श्रीगोंदा बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ असतानाच एका ५२ वर्षीय महिलेला फसवून तिच्याकडील सुमारे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना २१ जून रोजी घडली होती. या घटनेतील चार भामट्यांना श्रीगोंदा पोलिसांनी केवळ १७ दिवसांत अटक करून चोरी गेलेले दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे.

या संदर्भात कांता मुळे (वय ५२) या महिलेनं श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, प्रवासादरम्यान श्रीगोंदा बसस्थानकावर विकास जाधव (रा. पाटोदा), अभिमान तुपे (रा. पाटोदा), दत्ता जोरे (रा. शिरूर) आणि विकी तुपे (रा. पाटोदा) या चौघांनी मिळून महिलेला बनावट सोन्याचे बिस्किट दाखवून व त्याचे आमिष देत दागिने हातचलाखीने चोरून नेले होते.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंदे आणि अरुण पवार यांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून संपूर्ण चोरी गेलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पडली असून श्रीगोंदा पोलिसांचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. प्रवाशांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सतर्क राहावे, अशीही सूचनाही पोलिसांनी दिली आहे.

—स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise…
