श्रीगोंदा, दि. ८ जुलै २०२५:
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ आणि भारत सहकार, सहकार मंत्रालय स्थापना दिना निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर सहकार सप्ताह (१ जुलै ते ६ जुलै) साजरा करण्यात आला. यानुसार, सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तर, तालुकास्तर व विभागीय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यातही याचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील सहकार सप्ताहाची सुरुवात
सहकार सप्ताहानिमित्त श्रीगोंदा तालुक्यात सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था श्रीगोंदा, तालुका लेखापरीक्षक, तालुका विकास अधिकारी, सहकार बँक, श्रीगोंदा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच श्रीगोंदा तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जुलै ते ४ जुलै दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले.

दिनांक २ जुलै रोजी श्री. नारायण परजणे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्थांचे प्रतिनिधी यांची सभा झाली. यामध्ये सभासद संख्या वाढ यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
वृक्षारोपण व शालेय स्पर्धा
३ जुलै रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच दिवशी श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा येथे मुलींसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धक विद्यार्थिनींना पारितोषिक म्हणून वह्या देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका भोईटे मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य उल्लेखनीय होते.

सहकार दिंडी – सहकार प्रचाराचे प्रभावी माध्यम
३ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीगोंदा येथील सहकारी संस्थेच्या कार्यालयापासून सहकार दिंडी काढण्यात आली. भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात, सहकार गीतांच्या सादनेत श्रीगोंदा शहरातून ही दिंडी निघाली. विविध कार्यकारी संस्था, पतसंस्था, संचालक, पदाधिकारी, सचिव, मॅनेजर व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
दिंडीची सांगता सहकार ध्वजारोहणाने झाली. यानंतर सर्व सहभागी सदस्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली.

तांत्रिक मार्गदर्शन सत्र
दिंडीच्या समारोपानंतर, पतसंस्था व विविध कार्यकारी संस्थांचे सचिव व पदाधिकारी यांची स्वतंत्र सभा झाली. यामध्ये ई-ऑडिट, संगणकीकरण व सहकार मूल्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले. श्री. नारायण परजणे यांनी तांत्रिक मुद्द्यांवर मोलाचे मार्गदर्शन केले, तर प्रशिक्षण केंद्राचे श्री. साखरे सर यांनी सहकार मूल्यांवर भाष्य केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. भाऊसाहेब सिनारे (सहकार अधिकारी श्रेणी १) यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशामागील हातभार
संपूर्ण सहकार सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले:
- श्री. नारायण परजणे – सहाय्यक निबंधक
- श्री. भाऊसाहेब सिनारे – सहकार अधिकारी
- श्री. सुनिल शेलुकर, श्री. निलेशकुमार मुंढे, श्री. सतिष औरंगे
- सौ. अलका भवर, कु. अमृता भोसले
- तालुका विकास अधिकारी श्री. व्यवहारे, तालुका लेखापरीक्षक श्री. महेंद्र घोडके
- तालुका सचिव श्री. दत्तात्रय खळदकर
- पतसंस्था फेडरेशनचे श्री. गणेश डोईफोडे आणि सर्व सचिव मंडळी

श्रीगोंदा तालुक्यातील हा सहकार सप्ताह हा केवळ एक औपचारिकता न राहता सहकाराचे मूलतत्त्व, मूल्ये व कार्यपद्धती समाजापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरले, असे मत सहभागी मान्यवर व संस्थाचालकांनी व्यक्त केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
