दिनांक ९ जुलै २०२५,श्रीगोंदा:
शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणावरून श्रीगोंद्यात आंदोलनाचे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांना परतावा आणि मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवनाथ आवताडे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य व शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी १४ जुलैपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, सिस्पे आणि इन्फनाईट बिकॉन यांसारख्या कंपन्यांमार्फत श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. नवनाथ आवताडे याने जादा परताव्याचे आमिष दाखवत लाखो रुपये गोळा केले. मात्र, अनेक वर्षे उलटूनही गुंतवणूकदारांना ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम.

म्हस्के यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “२०१५ पासून सुरू असलेल्या या आर्थिक गैरव्यवहाराकडे प्रशासन व पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. इतक्या मोठ्या प्रकरणामागे कोणत्यातरी राजकीय किंवा आर्थिक आशीर्वाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

ते पुढे म्हणाले, “गुन्हा दाखल होणे हे देखील आरोपींच्या डावपेचाच भाग असू शकतो. गुंतवणूकदार तक्रारी करू नयेत म्हणून त्यांना खोटी आश्वासने दिली गेली. पण आता लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर संताप अनावर झाला आहे.”

पोलिसांनी आरोपींची पारपत्रे जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. “आवताडे हा याआधीही गुन्हेगार ठरलेला आहे. त्यामुळे त्याच्यासह इतर संचालकांनाही तातडीने अटक करावी,” असेही म्हस्के यांनी ठणकावून सांगितले.

या पार्श्वभूमीवर सोमवार, दिनांक १४ जुलै रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य आंदोलन आणि उपोषण करण्यात येणार आहे. फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असून, श्रीगोंद्यात या प्रकरणावरून तीव्र जनक्षोभ उसळण्याची चिन्हे आहेत.
स्रोत:(पत्रकार परिषद)
