श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना अंधारात ठेवून एसपींची मोठी कारवाई; श्रीगोंदा पोलीस यंत्रणेचे अपयश चव्हाट्यावर.!

दिनांक २७ मे २०२६,श्रीगोंदा:

तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी थेट ॲक्शन मोडवर येत मोठी कारवाई केली आहे. एसपींना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या विविध हॉटेल्समधील अवैध देशी व विदेशी दारू विक्रीवर बेलवंडी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

मात्र, स्थानिक पोलिसांना हुलकावणी देत झालेल्या या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. बेलवंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व त्यांच्या पथकाने पारगाव आणि श्रीगोंदा शहरातील हॉटेल दोस्ती (पारगाव), हॉटेल संजोग, हॉटेल वैष्णवी, हॉटेल निसर्ग यांच्यावर कारवाई करण्यात आली.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असताना, स्थानिक यंत्रणेला याची भणंगही लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

सर्वसाधारणपणे कोणत्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करताना स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते किंवा त्यांना पूर्वकल्पना असते. परंतु, पोलीस अधीक्षकांनी श्रीगोंद्यातील अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी थेट ‘बेलवंडी पोलीस’ यंत्रणेचा वापर केला. यावरून पोलीस अधीक्षकांचा श्रीगोंदा पोलीस यंत्रणेवर आणि पोलीस निरीक्षकांवर विश्वास राहिलेला नाही का?

की स्थानिक पोलीस आणि वरिष्ठांमधील समन्वय संपला आहे? असा थेट प्रश्न आता या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading