दिनांक १५ ज्यू २०२५,श्रीगोंदा:
इन्फिनाईट बीकॉन, सिसपे अशा नावाने चालवलेल्या कंपन्यांमार्फत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा, नगर, पुणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल असलेले मुख्य आरोपी नवनाथ अवताडे व त्याचे इतर सहकारी अजूनही मोकाट फिरत आहेत. या आरोपींना तातडीने अटक करून गुंतवणूकदारांना न्याय मिळावा, या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर सोमवारी (१४ जुलै) स्थगित केले आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट देऊन चर्चा केल्यानंतर म्हस्के यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या उपोषण काळात भरपावसातदेखील गुंतवणूकदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.

राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, “या दोन दिवसांमध्ये पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांनी माझ्याशी संपर्क साधला असून, त्यांच्या गुंतवणुकीची माहिती घेतली आहे. सद्यस्थितीत १३ ते १४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे आणि हा आकडा वाढत जाणार आहे.”

त्यांनी यामध्ये अटक न झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत पुढील तपास ईडीकडे (अंमलबजावणी संचालनालय) वर्ग करावा, अशी भूमिका मांडली. त्यांनी पुढे म्हटले की, “या घोटाळ्यात आणखी सात प्रमुख आरोपींचा समावेश होणार आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत. संबंधित बोगस कंपन्यांचीही चौकशी व्हावी आणि त्यांचे व्यवहार जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”

म्हस्के यांनी लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. “आर्थिक तज्ञ आणि कायदेतज्ज्ञांच्या मदतीने न्यायालयीन लढाई लढणार असून सर्व गुंतवणूकदारांना सोबत घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
