प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात जोडे मारो आंदोलन! दीपक काटेचा पुतळा फोडून तीव्र निषेध..

दिनांक १५ जुलै २०२५,श्रीगोंदा (प्रतिनिधी):

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाई टाकून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी हल्ल्याचा मुख्य आरोपी दीपक काटे व त्याचे सहा साथीदार यांचा निषेध करत तहसील कार्यालयासमोर दीपक काटेचा पुतळा तयार करून त्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या समविचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेस युवक अध्यक्ष निशांत लोखंडे यांनी आपल्या भाषणात हल्लेखोरांचा खरपूस समाचार घेतला. तसेच मुकुंद सोनटक्के यांनी दीपक काटेला सार्वजनिक इशारा देत कडक शब्दांत निषेध व्यक्त केला.

ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमरजी घोडके यांनी आपल्या भाषणात तीव्र प्रतिक्रिया देत हल्लेखोरांच्या मानसिकतेवर सवाल उपस्थित केले. युनिटी ऑफ मूलनिवासी समाजाचे प्रतिनिधी सुरेश रणवरे यांनी देखील कठोर शब्दांत दीपक काटेच्या कृत्याचा निषेध केला.

संभाजी ब्रिगेडचे अहिल्यानगर कार्याध्यक्ष सुनील ढवळे, शहराध्यक्ष दिलीप लबडे, तालुकाध्यक्ष वैभव वनशिव, आणि तालुकाध्यक्ष (राजकीय पक्ष) श्याम जरे यांनीही आक्रमक भाषण करत, “दीपक काटेला दिसेल तिथं संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा दिला. जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे म्हणाले की, “प्रवीण दादांनी स्पष्ट इशारा दिला होता, शेवटाचा कुन आणि सुरुवात असा.”

प्रवीण दादा गायकवाड गेली २८ वर्षे संघटनेत कार्यरत असून, महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांत संभाजी ब्रिगेड पोहोचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी पार पाडले आहे. त्यांच्या वरच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या आंदोलनात विविध संघटनांनी सामील होत एकतेचे दर्शन घडवले.

या आंदोलनात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये अपंग संघटनेचे राजेंद्र पोकळे, राहुल शिंदे, विठ्ठल सावंत, सनी मस्के, यश ओवळ, सागर हिरडे, गणेश पारे, हर्षद दिवटे, माजी नगराध्यक्ष अख्तर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र पाटोळे, सुरज साळवे, जीवन ससाने, शेख सद्दाम यांचा समावेश होता.

यावेळी पोलिस बंदोबस्तात आंदोलन पार पडलं असून, आंदोलकांनी प्रशासनाकडे मागणी केली की दीपक काटे याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.

स्रोत:(आंदोलन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading