दिनांक १५ जुलै २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे घरात झोपलेल्या साठ वर्षीय वृद्धेवर अज्ञात चोरट्याने हल्ला करून गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, चोरट्याने ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या प्रकरणी श्रीमती चंपावती दत्तात्रय दिवटे (वय ६०) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जुलै रोजी पहाटे साडे दोनच्या सुमारास त्या झोपेत असताना अज्ञात इसम बॅटरीच्या उजेडात घरातील वस्तूंची उचकापाचक करताना दिसला. त्यांनी आरडा-ओरड केली असता चोरट्याने त्यांना मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील सोन्याचे फुले व वेल जबरदस्तीने तोडून घेतले.

हल्लेखोराने त्यांच्या मुलाच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली होती. चोरट्याच्या मारहाणीमुळे चंपावती दिवटे गंभीर जखमी झाल्या असून चोरट्याने घरातील कपाटातील अंगठीसह एकूण ६४ हजारांचा ऐवज चोरून नेला. श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त..)



Advertise…
