श्रीगोंद्यात दोघांनी पेट्रोल पंप मॅनेजरकडून २.२० लाखांची रोकड हिसकावली.!

श्रीगोंदा (दि. २ जुलै २०२५) :

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धाडसाचे प्रदर्शन करत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरकडून तब्बल २,२०,००० रुपयांची रोकड भर रस्त्यात बळजबरीने हिसकावून नेली आहे. ही घटना दिनांक १ जुलै रोजी रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास मांडवगण रोडवरील कुकडी डी.वाय.चारी नं. ११ जवळ घडली.

फिर्यादी संदीप एकनाथ भुतकर (वय ३७, रा. साळवणदेवी रोड, श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या चार वर्षांपासून शिव पार्वती फ्युएल्स पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दिनांक १ जुलै रोजी पंपावर पेट्रोल-डिझेलचा टँकर पोहोचल्याने, त्या दिवसाची सर्व विक्री व उधारी मिळवून एकूण २,२०,०००/- रुपये रोकड भरणा करण्यासाठी ते अॅक्सिस बँकेच्या सीडीएम मशिनकडे निघाले होते.

दरम्यान, मांडवगण ते श्रीगोंदा दरम्यानच्या रस्त्यावर अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली. त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने संदीप यांच्या मोपेडवर ठेवलेली बॅग, ज्यात रोख रक्कम होती, ती बळजबरीने हिसकावून घेतली आणि ते पलायन झाले. त्यांनी मोटारसायकलने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी बेलवंडी कोठार दिशेने पसार झाले. दोघेही सुमारे २५ वर्षे वयाचे, राखाडी शर्ट व पांढऱ्या पॅंटमध्ये होते. ते बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर, जी विना नंबरची होती, आले होते.

चोरट्यांनी हिसकावून नेलेली बॅग निळसर रंगाची असून त्यावर सिल्व्हर पट्टा होता. त्यामध्ये ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading