‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी नागरिक सर्वेक्षण सुरू – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन..

दिनांक ३ जुलै २०२५,अहिल्यानगर:

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन विकासदृष्टीकोनाच्या तयारीसाठी राज्य सरकारतर्फे १६ क्षेत्रांवर आधारित राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले मत, अपेक्षा व आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करून व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीत योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी https://wa.link/o93s9m किंवा https://vikasitmaharashtra.civis.vote/consultations/1245/read या लिंकवर भेट देऊन अथवा QR कोड स्कॅन करून आपले मत नोंदवावे. या प्रक्रियेत कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत@२०४७ अंतर्गत देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्र राज्याने २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या उपक्रमांतर्गत तयार होणाऱ्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टांचा समावेश असून, कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, जलसंपदा, पायाभूत सुविधा, उद्योग, वित्त, मनुष्यबळ व्यवस्थापन इत्यादी १६ क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गावपातळीवरील अधिकारी यांनी नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि सर्वेक्षणात सहभाग वाढावा यासाठी दर्शनी भागांवर फलक लावावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

राज्याच्या विकास आराखड्यात नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading