दिनांक १ जुलै २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात सुरु झालेले चोरी आणि दरोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. चांडगाव येथे नुकताच दरोड्याचा प्रकार घडलेला असतानाच, आता लिंपणगाव गावच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना सोमवार दिनांक ३० जूनच्या रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडली. आज सकाळी मंदिराचे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले असता, मंदिरातील कुलूप तोडलेले आणि दानपेटी फोडलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरटा कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली आणि पळ काढला. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

ग्रामदैवताच्या मंदिरात अशी चोरी झाल्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी लवकरात लवकर चोरट्याला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यातील सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
