दिनांक २३ जानेवारी २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा शिवारातून चोरीला गेलेला ३१ लाख रुपये किमतीचा हार्वेस्टर शोधण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी चक्क कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यापर्यंत पाठलाग करून हे मशीन जप्त केले आहे.

चिंभळा येथील शेतकरी अशोक भाऊसाहेब वागस्कर यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी बेलवंडी पोलीस ठाण्यात हार्वेस्टर चोरीबाबत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा (रजि. नं. ६८१/२०२३) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सपोनि नंदकुमार सोनवलकर यांनी तांत्रिक तपास सुरू केला होता.

तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. तपासाची चक्रे फिरवत हे पथक आधी कोल्हापूर व सांगली परिसरात पोहोचले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार, चोरीचा हार्वेस्टर कर्नाटक राज्यात असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तत्काळ कर्नाटक गाठले आणि अरर्बियतवाडी (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथून भीमु भैरू हिंगलजे याच्या ताब्यातून ३१ लाखांचा हार्वेस्टर जप्त केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि डीवायएसपी प्रविण चंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि: नंदकुमार सोनवलकर, पोसई: मोहन गाजरे, कर्मचारी: यशवंत ठोंबरे, रवि जाधव, भांडवलकर यांच्या पथकाने केली आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
