दिनांक २४ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक, न्यायी आणि प्रजावत्सल राजे होते. त्यांच्या राज्यात मंदिर आणि मशीद दोन्ही सुरक्षित होते. मात्र, काही मूठभर लोकांनी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा चुकीचा इतिहास पुसून महाराजांचे खरे चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची गरज आहे,” असे परखड मत थोर विचारवंत व सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचचे संस्थापक डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा येथे सावित्री फातिमा सद्भावना मंच, समविचारी नागरिक व उत्सव समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शकीलभाई शेख होते.
महाराजांचा औरंगजेबाशी असलेला लढा धर्मासाठी नसून स्वराज्यासाठी होता. त्यांच्या अंगरक्षक आणि विश्वासू सैनिकांमध्ये अनेक मुस्लिम मावळ्यांचा समावेश होता.
ॲड. संभाजी बोरुडे यांनी केवळ डी.जे. लावून गोंगाट करण्यापेक्षा व्याख्याने आणि स्पर्धांच्या माध्यमातून महाराजांचा प्रेरणादायी इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

समाजात पसरलेला द्वेष दूर करण्यासाठी सत्यशोधक पद्धतीने काम करून माणसे जोडणे हेच सर्वात पवित्र कार्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. रफिक सय्यद, ॲड. संभाजी बोरुडे, विजय चव्हाण (पत्रकार), मुकुंद सोनटक्के, लांडगे महाराज, भीमराव कोथिंबीरे, बापुराव औटी, डॉ. राजेंद्र डाळिंबे, ॲड. महेंद्र शिंदे, फिरोज मालजपते, आनंदकर, पिनू भैलुमे, सौ. ताडे, हे होते.
या प्रसंगी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचचे पदाधिकारी आणि श्रीगोंद्यातील अनेक समविचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
