#श्रीगोंदा तालुक्यात क्रिडा विभागाचा फज्जा! — तालुका क्रिडा अधिकारी ३ वर्षांपासून गायब; कार्यालयच नाही, योजनाही ठप्प… पगार थांबवून निलंबनाची मागणी..

दिनांक १६ जुलै २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील युवकांसाठी शासनाच्या विविध क्रिडा योजनांचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या तालुका क्रिडा अधिकारी दिलीप दिघे यांच्याविरोधात गंभीर तक्रार उभी राहिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या अधिकाऱ्यांचे श्रीगोंदा येथे ना कार्यालय आहे, ना त्यांची हजेरी. त्यामुळे तालुक्यातील युवा आणि खेळाडूंना शासनाच्या योजना केवळ कागदापुरत्या उरल्या आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात ११७ महसुली गावे असून युवकांची मोठी संख्या आहे. पण क्रिडा योजनांची अंमलबजावणी होण्याऐवजी, फक्त फायली फिरत असल्याची स्थिती आहे. तालुका क्रिडा अधिकारी दिलीप दिघे हे गेल्या ३ वर्षांपासून अनुपस्थित असून त्यांनी एकदाही श्रीगोंदा येथे प्रत्यक्ष हजेरी लावल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

“त्यांचे कार्यालय कुठे आहे, हेच अद्याप स्पष्ट नाही. शासनाने या प्रकरणाची चौकशी करावी,” अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा येथे क्रिडा विभागासाठी उभारण्यात आलेली सुमारे १ कोटी रुपये खर्चाची इमारत देखील वापराविना जीर्ण झाली आहे. इमारतीची पडझड होत असून देखभाल, वापर किंवा उपयोजनाचा अभाव दिसतो.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी वरिष्ठ प्रशासनाशी पत्रव्यवहार करत तालुका क्रिडा अधिकाऱ्यांचा पगार थांबवण्याची तसेच निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी जिल्ह्यातील इतर तालुका क्रिडा अधिकारी आणि कार्यालयांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

“नगर जिल्ह्यात एकूण किती तालुका क्रिडा अधिकारी कार्यरत आहेत? त्यांच्या कार्यालयांचे अस्तित्व आणि उपस्थिती काय आहे?” या प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे जिल्हा क्रिडा अधिकारी यांचीही जबाबदारी निश्चित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही अनिल ठवाळ यांनी दिला असून, या गंभीर निष्काळजीपणावर शासन काय भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्रोत:(अनिल ठवाळ यांचे निवेदन)

क्रीडा विभाग आणि कार्यालयाची दुरावस्था..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading