“विक्रम पाचपुते-निलेश लंकेंच्या उपस्थितीत इनफनाइट बीकॉनचा डंका; आत्ता गुंतवणूकदार मात्र रडकुंडीला”..! पहा उद्घाटन सोहळ्याचा व्हिडिओ..

श्रीगोंदा (प्रतिनिधी) | दिनांक १० जुलै २०२५ :

श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, पारनेर परिसरात ‘सिस्पे इनफनाइट बीकॉन’ या ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना हजारो कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनसह काही वकिलांकडे या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गुन्हे नोंदवले जात आहेत. मात्र, या गंभीर प्रकरणात पोलिस यंत्रणांकडून होत असलेली टाळाटाळ आणि प्रशासनाची उदासीनता गुंतवणूकदारांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे.

२०२४ साली या कंपनीचा प्रचंड प्रचार करण्यात आला होता. विशेषतः ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘इनफनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ या नावाने श्रीगोंदा शहरात एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार श्री. विक्रमसिंग पाचपुते हे उपस्थित होते. याच कंपनीच्या सुपा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते.

या भव्य दिव्य कार्यक्रमांमुळे आणि नेत्यांच्या उपस्थितीमुळे सामान्य जनतेला या कंपनीबाबत प्रचंड विश्वास वाटला.? सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी या सोहळ्यांमध्ये सहभागी झाल्याने लोकांनी आपले कष्टाचे लाखो-कोटींचे पैसे या कंपनीमध्ये गुंतवले.?

मात्र, वेळ आली तेव्हा या कंपनीने ना परतावा दिला ना मुद्दल. कंपनीचे दलाल आणि एजंटसुद्धा आता टाळाटाळ करत असून अनेक नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काहींनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच चौकशीसाठी वारंवार बोलावून मनस्ताप दिला जात असल्याचे आरोप आहेत.

पोलीस गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी काही पीडितांना आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याच्या चर्चा होत आहेत. परिणामी अनेकांनी थेट पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांच्याकडे धाव घेतली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यात आता आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. काही समाजिक कार्यकर्ते व गुंतवणूकदारांनी आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘इनफनाइट बीकॉन’ कंपनीच्या भामटेबाज दलालांविरोधात कठोर कारवाई आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

इनफनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ चा श्रीगोंद्यातील उद्घाटन सोहळा..
सुपा पारनेर तालुक्यातील उद्घाटन सोहळा..

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading