दिनांक १० जुलै २०२५,श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील श्रीगोंदा-दौंड रोडलगत असलेल्या महात्मा फुले सर्कल परिसरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकारास विरोध दर्शवत ॲड. सुमित बोरुडे यांनी दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनात ॲड. बोरुडे यांनी नमूद केले आहे की, श्रीगोंदा नगरपरिषदेने लाखो रुपयांचा निधी खर्चून महामानव महात्मा फुले यांचे भव्य स्मारक उभारले आहे. या स्मारकाजवळ दरवर्षी महात्मा फुले जयंतीचे भव्य आयोजन करण्यात येते. मात्र, या स्मारकाच्या अगदी शेजारी काही फुटांवरच एक शेड उभारून अनधिकृत मटका व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अवैध धंद्यास स्थानिक राजकीय वरदहस्त लाभलेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यामुळेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नसून, उलट या अड्ड्याला अप्रत्यक्षरित्या पाठबळ दिले जात असल्याचे बोरुडे यांनी स्पष्ट केले आहे. महात्मा फुले यांच्यासारख्या थोर समाजसुधारकाच्या स्मारकाच्या शेजारीच जुगाराचा अड्डा चालू राहणे ही शासनाच्या धोरणांची थट्टा असून, जनतेसाठी अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकाराविरोधात प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा दिनांक १६ जुलैपासून पोलिस अधीक्षक कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याची तातडीने सूचना त्यांनी दिली आहे.

स्रोत:(निवेदन)


Advertise…
