श्रीगोंदा, दि. २ सप्टेंबर २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रसिद्ध सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या संजीवन समाधी स्थळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या वादग्रस्त घटनेवरून संत शेख महंमद बाबा यांचे वंशज व पुजारी राजु शेख यांनी गोपाळ मोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दि. २९ ऑगस्ट रोजी ना. अजित पवार बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता, त्यांच्या हातून प्रथेनुसार चादर अर्पण करण्यात आली. मात्र, घनश्याम शेलार यांचे समर्थक भोजराज मोटे यांनी अर्पण केलेली चादर उपस्थितांच्या समोरच ओढून घेतल्याचा प्रकार घडला. यामुळे संतापलेल्या अजितदादांनी “माझ्या समोर असे प्रकार घडत असतील तर मागे काय होत असेल?” अशा शब्दांत रोखठोक इशारा दिला होता.

राजु शेख यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घडलेला प्रकार हा राज्यातील एक मोठ्या नेत्याचा आणि संतांच्या परंपरेचा अवमान आहे. गोपाळ मोटे हे याबाबत जनतेची दिशाभूल करत असून ना. अजित पवार यांनी केलेले वक्तव्य खोटे ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे शेलार आणि मोटे समर्थकांची सर्वत्र नाचक्की झाली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “ना. अजितदादा समाधीस्थळी येणार असल्याची माहिती असूनही शेलार यांचे १५-२० समर्थक गाभाऱ्यात १-२ तास आधीच ठाण मांडून बसले होते. पोलीस व इतरांनी वारंवार विनंती करूनही ते बाहेर आले नाहीत. परिणामी उपमुख्यमंत्री दादांना समाधीसमोर उभे राहून चादर अर्पण करणे अवघड झाले. तरीही त्यांनी चादर अर्पण केली; मात्र भोजराज मोटे यांनी सार्वजनिकरित्या चादर काढून घेतली, ही संतांच्या परंपरेचा आणि राज्यातील उच्च पदस्थ नेत्याचा अवमान करण्याची कृती आहे.”

शेख यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कधीच कांगावा केलेला नाही. अजितदादा स्पष्ट बोलणारे नेते आहेत. शब्दांचा विपर्यास करण्याची आमची इच्छा नाही. मात्र गोपाळ मोटे खोटे पसरवून वातावरण बिघडवत आहेत.” याबाबतचा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आल्याने “कोण सत्य बोलत आहे आणि कोण दिशाभूल करीत आहे” हे लोकांच्या लक्षात आले असल्याचेही शेख यांनी सांगितले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
