श्रीगोंदा : शेख महंमद समाधी मंदिर वाद — गुरुवारच्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती; जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कृती समितीचा निर्णय..

दिनांक ३० जुलै २०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी):

— सदगुरू श्री संत शेख महंमद महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारात अडथळा ठरणाऱ्या वक्फ बोर्डाकडील ‘शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट’ नोंदीविरोधात गुरुवारपासून नियोजित असलेले आंदोलन सध्या स्थगित करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. ही माहिती समितीचे निमंत्रक घन:शाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

श्री शेलार यांनी सांगितले की, दिनांक २८ जुलै रोजी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक असलेली कारवाई आणि अडथळ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट’ ही वक्फ बोर्डातील बेकायदेशीर नोंद रद्द करण्यासाठी आंदोलनाऐवजी न्यायालयीन मार्ग आणि प्रशासनिक प्रयत्नांचा अवलंब करण्याचे ठरवण्यात आले.

त्याच दिवशी समितीच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या वादातील वस्तुस्थिती स्पष्ट केली. ग्रामस्थांची भावना, मंदिराबाबतची श्रद्धा आणि जीर्णोद्धाराची तळमळ त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

तथाकथित वंशज आणि ट्रस्ट अध्यक्ष भाविकांच्या श्रद्धेवर आघात करणारी भूमिका घेत असून, त्यांच्या कृतीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही समितीने निदर्शनास आणून दिले.

या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविक-भक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समितीचे निमंत्रक घन:शाम शेलार यांनी केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading