दिनांक ३० जुलै २०२५,श्रीगोंदा (प्रतिनिधी):
श्रीगोंदा नगरपरिषद व रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस एलएलपी या कंत्राटदार संस्थेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चा दबाव लक्षात घेत घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर लेखी आश्वासन दिले असून, यानंतर आजचे घोषित आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती RPI (A) चे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ गायकवाड यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार RPI (A) तर्फे नगरपरिषद व संबंधित कंत्राटदारास निवेदन देण्यात आले होते. यात घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगार वेळेवर मिळावा, मासिक PF व पगाराचा तपशील मिळावा, पगार वाढ करावी, सेफ्टी किट दिली जावी, आठवड्यातून एक पगारी सुट्टी लागू करावी, आणि थकीत पगार तत्काळ देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश होता.

या मागण्यांकडे प्रशासनाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्याआधीच नगरपरिषदेने लेखी पत्राद्वारे मागण्या मान्य केल्या. यामध्ये “विभाग प्रमुखांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, कर्मचारी सुट्टीसाठी ठेकेदार व नगरपालिका चर्चा करून निर्णय घेतील,” अशी ग्वाही देण्यात आली.

उपोषण स्थगित करताना निलेशभाऊ गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “नगरपरिषद व ठेकेदाराने दिलेल्या लेखी आश्वासनाची पुढील सात दिवसांत अंमलबजावणी झाली नाही, तर याच मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.”

या वेळी RPI (A) चे पदाधिकारी व कार्यकर्ते अक्षय लगाडे, संदीप घोडके, विकास शिंदे, शुभम आठवले, मयूर घोडके, नागेश उमाप, आपला काळे, कृष्णा ससाने, आरती घोडके, कांचन घोडके, आशा नरवडे, विजयमाला घोडके, पल्लवी घोडके, अक्षरा घोडके आदी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
