दिनांक १८ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी दिली आहे. दिवाळीनंतर लगेचच या निवडणुका अपेक्षित आहेत.

२०१९ मध्ये नवीन पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने श्रीगोंदा विधानसभा व नगरपरिषद निवडणुका लढवून आपले अस्तित्व प्रभावीपणे दाखवून दिले होते. त्यावेळी पक्षाच्या उमेदवारांनी अनेक दिग्गज उमेदवारांना कडवी टक्कर देत जनतेत आपली छाप पाडली होती.

इंजि. जरे यांनी सांगितले की, २०१९ पासून आजपर्यंत संभाजी ब्रिगेड पक्षाने संघटनात्मकदृष्ट्या मोठी प्रगती केली आहे. विचारांचे बळ आणि प्रभावी कार्यसंघटनेच्या माध्यमातून पक्षाची ताकद अनेक पटींनी वाढली आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, कामगार, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आणि शेतकरी अशा विविध घटकांना पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये सहभागी करून घेण्यात यश मिळाले आहे.

पक्षाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा दिला होता. प्रत्येक सभेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या शैलीत जनतेचे प्रश्न मांडले आणि खासदार लंके यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
तसेच, विधानसभा निवडणुकीत अपक्ष माजी आमदार राहुल दादा जगताप यांना मोठ्या मेळाव्यातून जाहीर पाठिंबा देत, आघाडीच्या उमेदवाराला मागे टाकून पक्षाची ताकद सिद्ध केली होती.

संभाजी ब्रिगेड पक्षाने आगामी निवडणुकांसाठी काही प्रमुख जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यात मांडवगण (२ गण), आढळगाव (२ गण), कष्टी (२ गण) या जिल्हा परिषद गटांचा आणि श्रीगोंदा नगरपरिषदेचा समावेश आहे.
भानगाव पंचायत समिती गणासाठी तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे स्वतः प्रबळ दावेदार आहेत. तसेच, काष्टी गणासाठी उपाध्यक्ष प्रफुल्ल उर्फ बापु जगताप, आढळगाव गटात शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आबा वाळुंज यांच्या सौभाग्यवती यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद प्रभाग क्र. ४ साठी उपाध्यक्ष दिलीप लबडे आणि प्रभाग क्र. २ साठी सचिव सुयोग धस यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. इतर ठिकाणीही अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक असून, योग्य आणि पात्र व्यक्तींना संधी दिली जाईल, असे इंजि. जरे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील अनुभव, संघटनेचे बळ आणि जनतेचा मिळालेला पाठिंबा या त्रिसूत्रीच्या जोरावर संभाजी ब्रिगेड पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे मोठे यश प्राप्त करेल, असा ठाम विश्वास तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांनी व्यक्त केला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
