दिनांक १९ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, शहराच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून श्रीगोंदा नगरपालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.

शहराच्या विकासाची मोठी हानी कथित ‘काळू-बाळू’ मुळे झाली असून, या ‘काळू-बाळूं’ ला पुन्हा नगरपालिकेच्या सत्तेत येण्यापासून रोखण्याची तयारी श्रीगोंदा क्षेत्रातील तरुण कार्यकर्त्यांनी केली आहे.

शहरातील काही विकसित मुद्द्यांवर बोलताना, ‘बगाडे कॉर्नर ते एस आर हॉटेल अहिल्यानगर रोड पर्यंत सर्वसामान्य माणसाने गाडी चालवून दाखवावी,’ असे थेट आव्हान कार्यकर्त्यांनी दिले आहे. या परिसरातून जाताना धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

‘चंद्रावर जेवढे खड्डे त्यापेक्षा जास्त खड्डे श्रीगोंदा शहरात रस्त्यांवर आहेत,’ अशी उपरोधिक टीकाही करण्यात आली. ज्यांच्याकडे व्हिजन नाही, पण पैसा आहे, असे लोक सत्तेत गेल्यामुळे सामान्य श्रीगोंदावासीयांना हे भोगावे लागत आहे, अशी भावना व्यक्त झाली.

सध्याच्या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण होताना दिसत आहे. श्रीगोंदा शहरातील विकासाच्या नावाखाली काही नेत्यांनी रस्ते, डांबर, सिमेंट खाऊन मातब्बर झाले. ‘ज्यांच्या अडचणी निर्माण झाल्या, ती सत्ताधाऱ्यांच्या मागे आणि त्या सत्ताधाऱ्यांना तर व्हिजनच नाही.’

‘भाजपवाल्यांना तर व्हिजनच नाही. शहरातील वाड्या-वस्त्यांवर जायला रस्ता नाही. शहराचे नाक असलेल्या शनी चौकात खड्डे आहेत. तीस वर्षात शहरातील खड्डे बुजले नाहीत,’ याकडे लक्ष वेधण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते शांताराम पोटे यांनी प्रतिक्रिया देताना, ‘हे काळू-बाळू जर पुन्हा सत्तेत आले, तर श्रीगोंदा शहराचे वाटोळ होणार,’ अशी भीती व्यक्त केली. ‘आता शहरातील सर्वसामान्य माणूस यांच्यावर चिडून आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना राजकारणात संधी द्या.

आम्ही येथील काळू-बाळू पाडून टाकणार. यांनी सगळ्या विकास कामात पैसे खाल्लेत अनं गब्बर सिंग झालेत. लोकांना दम देतात,’ असे ते म्हणाले.
स्रोत:(अधिकृत माहिती)
