श्रीगोंदा | दिनांक २६ ऑगस्ट २०२६:
श्रीगोंदा शहरात नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आरोग्य विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे श्रीगोंदा शहरात मागील एका महिन्यापासून शेकडो नागरिक फ्लू सदृश्य तापाने आजारी असल्याचे श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील दैनंदिन आकडेवारीवरून समोर आले आहे.
मागील एक महिन्यापासून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज २५० पेक्षा जास्त रुग्ण या तापाने बाधित होऊन उपचारासाठी येत आहेत. शहरात साथीचे आजार वेगाने पसरत असतानाही नगरपालिकेच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
श्रीगोंदा नगरपालिकेमार्फत शहरात कधीही नियमित औषध फवारणी, जंतुनाशक फवारणी किंवा फॉगिंग (Fogging) करण्यात आल्याचे कधीही निदर्शनास आलेले नाही.

आरोग्याचे ठेकेदार केवळ कागदोपत्री बिले काढण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पालिकेच्या या दुर्लक्षामुळे शहरात जागोजागी डासांचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. तसेच शहरातील वाढती दुर्गंधी नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजार पसरवण्याचे मुख्य कारण ठरत आहे.
नगरपालिकेच्या या कारभारावर संताप व्यक्त करत शहरातील काही नागरिकांनी चक्क ‘नगरपालिकेने फॉगिंग केल्याचा मागील वर्षातील एखादा फोटो दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे जाहीर आव्हान दिले आहे.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवून पालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी श्रीगोंदा शहरातील त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
