श्रीगोंद्यात नियम सर्वांसाठी समान लागू करा; दुजाभाव खपवून घेणार नाही — संभाजी ब्रिगेडचा इशारा


श्रीगोंदा | दि. १ सप्टेंबर २०२६

श्रीगोंदा शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांसाठी लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि धार्मिक कार्यक्रमांवर समान व भेदभावविरहित पद्धतीने करण्यात यावी. सत्ताधारी व प्रभावशाली व्यक्तींसाठी एक नियम आणि सामान्य नागरिकांसाठी दुसरा नियम, अशी दुहेरी भूमिका प्रशासनाने तातडीने थांबवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली.

शहरात रस्त्यालगत मंडप उभारणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, ध्वनिक्षेपक अथवा डीजेचा वापर याबाबत विविध निर्बंध लागू करण्यात येतात. मात्र, या नियमांची अंमलबजावणी निवडक पद्धतीने होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

एका कार्यक्रमासाठी रस्ता अडवला तर नियम आठवतात, मंडप उभारला तर नियम आठवतात आणि ध्वनिक्षेपक लावला तर नियम आठवतात; मग काही ठरावीक राजकीय व्यक्ती किंवा प्रभावशाली मंडळींच्या कार्यक्रमांच्या वेळी हेच नियम प्रशासनाला का आठवत नाहीत? कायदा हा व्यक्ती, पक्ष किंवा पद पाहून बदलणारा नसून सर्वांसाठी समान असला पाहिजे, अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.

या संदर्भात तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन देऊन सर्व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एकसमान नियमावली लागू करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही राजकीय दबाव अथवा प्रभाव न पाहता समान कारवाई करावी आणि यापूर्वी नियमभंग करणाऱ्या कार्यक्रमांवर झालेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.

“सत्ताधाऱ्यांसाठी एक नियम आणि सामान्य नागरिकांसाठी दुसरा नियम आम्ही कदापि स्वीकारणार नाही. प्रशासनाने कायद्याचा धाक दाखवायचा असेल तर तो सर्वांवर समान असला पाहिजे,” असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्क प्रमुख इंजि. शामभाऊ जरे यांनी दिला.

प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन समान व पारदर्शक नियमावलीची अंमलबजावणी न केल्यास तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन व संबंधित शासकीय कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष दिलीप लबडे, जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी दिलीप आबा वाळुंज, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी सद्दाम शेख, संघटक संतोष आरडे मेजर यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading