अल्पवयीन मुलीचा बालविवाह; श्रीगोंद्याच्या युवकासह सात जणांवर राजगड पोलिसांत गुन्हा दाखल..

दिनांक २५ ऑगस्ट २०२६, श्रीगोंदा/राजगड:

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीचे आई-वडील, श्रीगोंदा येथील वर, वराचे आई-वडील, एक नातेवाईक आणि विवाह लावून देणारा पुजारी अशा एकूण सात जणांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा विवाह लावला गेला. मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट माहिती असतानाही, तिचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील ऋषभ कुरूमकर याच्यासोबत लावून देण्यात आला.

या बेकायदेशीर विवाह प्रकरणात मुलीचे वडील, आई तसेच मुलाचे वडील बबन कुरूमकर, आई सीमा कुरूमकर, निलेश घाडगे आणि हिंदू रितीरिवाजानुसार विवाह लावून देणारा (नाव व पत्ता अद्याप निष्पन्न नसलेला) पुजारी यांनी सहभाग घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ग्रामपंचायत अधिकारी शैला गंगाराम आटोळे यांनी या प्रकरणाची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी गुन्हा नोंदवण्यात आला.

बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यामध्ये नेमका कोणाचा पुढाकार होता आणि इतर कोणी यात सहभागी आहे का, याचा कसून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करीत असून, पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या बालविवाह प्रकरणात श्रीगोंदा तालुक्यातील युवकाचे नाव समोर आल्यामुळे आणि प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत असल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply