श्रीगोंदा नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ‘रिपाइं’ आक्रमक; १५ एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

दिनांक ७ एप्रिल २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) ने प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक पिळवणुकीबाबत जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले असून, १५ एप्रिलपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अवस्थेबाबत निलेश गायकवाड यांच्याकडे लेखी गाऱ्हाणे मांडले होते. त्या आधारावर नगरपालिकेला सादर केलेल्या निवेदनात प्रामुख्याने तीन मागण्या करण्यात आल्या आहेत:

महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांचे उत्पन्न नगण्य असल्याने त्यांना नियमानुसार पगारवाढ मिळावी.

दर महिन्याचा पगार ७ तारखेच्या आत अदा करण्यात यावा, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह खंडित होणार नाही.

दोन वर्षांपासून रखडलेला पी.एफ. तात्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावा.

निलेश गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे की, हे कर्मचारी अत्यंत गरीब असून मुलांचे शिक्षण आणि आरोग्याचा खर्च पेलणे त्यांना कठीण झाले आहे. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल.

“कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हक्काचा पी.एफ. दोन वर्षांपासून रखडणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने १५ एप्रिल २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास होणाऱ्या आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.”
निलेश गायकवाड (जिल्हाध्यक्ष, रिपाइं – ए)

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading