श्रीगोंदा शहर अनधिकृत बॅनरच्या विळख्यात; नगरपालिकेचा महसूल बुडाला, अपघाताचा धोका वाढला! मुख्याधिकारी भगत यांची कठोर कारवाईची ग्वाही; तर सामाजिक कार्यकर्त्यांचा आमरण उपोषणाचा इशारा..

दिनांक २ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात सध्या अनधिकृत जाहिराती, कट-आउट्स आणि लोखंडी फ्रेम्सचा सुळसुळाट झाला असून, यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा तर येतच आहे, शिवाय नागरिक आणि वाहनचालकांसाठी हे जीवघेणे ठरत आहे.

नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता लावण्यात आलेल्या या अनधिकृत बॅनरबाजीमुळे शहरात अपघातांचे क्षेत्र निर्माण झाले असून, प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे.

शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे चौक, सार्वजनिक चौथरे, मंदिर परिसर आणि बस स्टॉप यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोखंडी फ्रेम्स उभे करून कट-आउट्स लावण्यात आले आहेत.

रस्त्यांच्या मध्यभागी लावलेल्या या अडथळ्यांमुळे वाहनचालकांना समोरील रस्ता दिसण्यास अडचण निर्माण होत आहे. विशेषतः वळणांवर लावलेल्या जाहिरातींमुळे अपघाताची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे.

या अनधिकृत जाहिरातींमुळे श्रीगोंदा नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. नियमानुसार जाहिरात लावण्यासाठी नगरपालिकेचे शुल्क भरणे अनिवार्य असते, मात्र येथे ‘दलालां’च्या माध्यमातून विनापरवाना फलक लावले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

जर या फलकांमुळे एखादा मोठा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण? नगरपालिका प्रशासन की हे अनधिकृत बॅनर लावणारे दलाल? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य श्रीगोंदाकर विचारत आहेत.

या गंभीर विषयाबाबत श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

https://amzn.to/4rpMaqC

त्यांनी सांगितले की “शहरातील अनधिकृत कट-आउट्स आणि बॅनरबाबत अतिक्रमण विभागाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत हे सर्व अनधिकृत साहित्य हटवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

प्रशासनाच्या आतापर्यंतच्या संथ भूमिकेमुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विनापरवाना कट-आउट्स आणि बॅनर तात्काळ काढले नाहीत, तर नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आता नगरपालिका प्रशासन दोन दिवसांत ही ‘बॅनरची जळमटे’ स्वच्छ करणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading