दिनांक १ डिसेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी ही माहिती दिली.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १ जागा आणि सदस्य पदासाठी २२ जागांसाठी निवडणूक होत आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रात एकूण २८,३२६ मतदार नोंदणीकृत आहेत, ज्यात १४,२५६ पुरुष आणि १४,०७० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सोयीसाठी ३२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. ७ मधील ‘ब’ जागेची निवडणूक प्रक्रिया मात्र २८ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थगित करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी एकूण १८६ कर्मचारी नेमण्यात आले आहेत, यात ६ सेक्टर अधिकारी आणि २ राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना केंद्रांवर पोहोचवण्यासाठी ४ एसटी बसेस, १ मिनीबस आणि ७ कार वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार पेटी आणि अतिरिक्त आसनव्यवस्था यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आज, दि. १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचारबंदी लागू झाली आहे. आचारसंहिता कक्षाचे कर्मचारी आणि दक्षता पथक मतदारसंघात नियमित पेट्रोलिंग करत आहेत.
निवडणुकीसाठी मतदान दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत होणार आहे. प्रशासनाने सर्व मतदारांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
मतमोजणीची प्रक्रिया दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शासकीय धान्य गोदाम, पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे पार पडेल, अशी माहिती श्री. चिंचकर यांनी दिली.
स्रोत:(प्रेसनोट)
