दिनांक १ डिसेंबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळा आणि स्मारकाच्या कामाला कोणी हरकत घेतली, याचा आमदार विक्रम पाचपुते साहेबांनी तातडीने खुलासा करावा, अशी माफक अपेक्षा सिद्धार्थ नगर, ससाणे नगर आणि भीम नगर येथील सामान्य समाज बांधवांकडून जोर धरत आहे.
श्रीगोंदा शहरातून जाणाऱ्या ५४८ डी महामार्गालगत भव्यदिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व स्मारक व्हावे, अशी समाज बांधवांची प्रबळ मागणी होती. यासाठी बाजारतळ येथील बारव शेजारील नियोजित जागा अधिग्रहित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.

यानुसार, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या नियोजित जागेवर नारळ अर्पण केला होता आणि सर्व समाज बांधवांशी चर्चा करून येथे भव्य बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती.
आमदार विक्रम पाचपुते यांनी समाज बांधवांना सूचित केले की, नमूद ठिकाणी आपल्या समाज बांधवातीलच एका व्यक्तीने तांत्रिक अडचण घेऊन हरकत घेतली आहे. यामुळे स्मारकाचे नियोजित काम थांबले.
मात्र, आमदार महोदयांनी आजपर्यंत या हरकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव गुलदस्त्यात का ठेवले आहे,.? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
काम थांबले आणि तक्रारदाराचे नावही कळाले नाही, यामुळे बौद्ध आणि मागासवर्गीय समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आमदार पाचपुते समाज बांधवांसोबत राजकारण तर करत नाहीत ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
आमदार विक्रम पाचपुते यांची भूमिका स्पष्ट असल्यास आणि त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसल्यास, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला विरोध करणाऱ्या व्यक्तीचे नाव त्वरित जाहीर करावे, अशी मागणी समाज बांधव करत आहेत. या मागणीमुळे स्मारकाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
स्रोत:(लोकांची चर्चा)
