दिनांक १८ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
माजी सैनिक नवनाथ खामकर यांच्यासाठी श्रीगोंदेकरांनी दाखवलेल्या अभूतपूर्व लोक सहभागातून एक प्रेरणादायी कहाणी उभी राहिली आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी नवनाथ खामकर आणि मयुरेश धारकर यांच्या श्रीगोंदा शहरातील ‘संकल्प एस मार्ट‘ किराणा मॉलला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि काही तासांतच त्यांचे जीवन उध्वस्त झाले.

या भीषण संकटाने माजी सैनिक खामकर पूर्णतः खचले होते आणि त्यांनी श्रीगोंद्यातून निरोप घेण्याची मनःस्थिती बनवली होती.

मात्र, याच वेळी त्यांच्या मित्र परिवाराने आणि समस्त श्रीगोंदेकरांनी त्यांना धीर दिला. “मेजर, तुम्ही जाऊ नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत,” हा शब्द मित्रांनी दिला आणि बघता बघता मदतीचे हात पुढे आले.

जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेकांनी मदतीचा ओघ सुरू केला आणि अवघ्या काही दिवसांतच २७ लाखांचा विक्रमी लोकसहभाग तयार झाला.

श्रीगोंदेकरांच्या या मदतीच्या बळावर नवनाथ खामकर यांच्या ‘संकल्प एस मार्ट’ मॉलनं राखेतून ‘फिनिक्स’ भरारी घेण्याची किमया साधली.

बांधकाम व्यावसायिक नवनाथ दरेकर आणि नानासाहेब कोंथिबीरे यांनी निस्वार्थ भावनेने मॉलच्या बांधकामावर लक्ष ठेवून काम पूर्ण केले, तर माजी सैनिक संघटना आणि हरिओम योगा ग्रुपने दररोज श्रमदान केले.

या लोकसहभागामुळे, तसेच व्यापारी बांधवांच्या मदतीने अवघ्या १७ दिवसांत २ हजार चौरस फुटाचा हा मॉलक पुन्हा उभा राहिला. हा ‘मित्रप्रेम मॉल’ पुन्हा सेवेत दाखल झाल्याने श्रीगोंदेकरांनी जल्लोष केला. या पुनरुभारणीच्या मॉलचे उद्घाटन विद्यार्थी आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार निलेश लंके, अनुराधा नागवडे, शुभांगी पोटे, पोपटराव खेतमाळीस, ज्योती खेडकर, राजू गोरे, शहाजी खेतमाळीस, अंकुश खोटे, रमाकांत चिकणे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी नवनाथ खामकर यांनी सर्वांचे आभार मानले.
स्रोत:(पत्रकार बाळासाहेब काकडे)
