दिनांक १८ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा/अहिल्यानगर:
काष्टी गावातील मालती दूध डेरीच्या सेल्समनचा आज (१८ ऑक्टोबर २०२५) सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास बाबुर्डी बेंद (ता. नगर) येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. या अपघातात दूध डेरीची पिक अप वॅन लोखंडी चॅनल असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.

या भीषण अपघातात काष्टी येथील सुरेश शेलार (वय अंदाजे ४०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीचे चालक ज्ञानेश्वर नागे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालती दूध डेरीचे सेल्समन सुरेश शेलार आणि चालक ज्ञानेश्वर नागे हे काही कामानिमित्त नगरला गेले होते.

नगरहून काष्टीकडे परत येत असताना बाबुर्डी बेंद येथे त्यांच्या पिक अप वॅनचा लोखंडी चॅनल असलेल्या ट्रकला जोरदार अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, सुरेश शेलार यांचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी प्रवासात येथून नगरकडे चाललेले श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे आणि घोसपुरी येथील वैभव साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मदत केली.

या दुर्दैवी घटनेमुळे काष्टी गावात शोककळा पसरली असून, शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
स्रोत:(मयूर शिंदे)


Advertise..
