श्रीगोंदा (३१ जुलै २०२५) –
काल रात्री सुमारे ११:३० च्या सुमारास शिवाजी चौक, श्रीगोंदा येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला. मात्र सामाजिक कार्यकर्ते संदीप भोईटे आणि तालुकाध्यक्ष (सामाजिक न्याय अजित पवार गट) कुणाल शिरवाळे यांनी वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे आणि तत्परतेमुळे त्या चिमुरडीचे प्राण वाचले.

या घटनेत कीर्ती गणेश कुंभार ही पाच वर्षांची मुलगी घरासमोर गेटजवळ उभी असताना अचानक काही मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर चाल करून हल्ला चढवला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा सुरू केला. त्या आवाजामुळे परिसरात उपस्थित असलेले संदीप भोईटे आणि कुणाल शिरवाळे तात्काळ घटनास्थळी धावले आणि त्यांनी प्रसंगावधान राखून त्या चिमुकलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप वाचवले. या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, केवळ किरकोळ जखमांवर तिच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे काळजी वाढली आहे. श्रीगोंदा शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे.

संपूर्ण शहरात अनेक वेळा रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अपघात झाले असून, काही दिवसांपूर्वी बाजारदिवशी एका महिलेला झुंजलेल्या वळूने गंभीर दुखापत केली होती. स्थानिक नागरिकांनी याविरोधात नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असतानाही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कीर्ती कुंभार हिच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी संदीप भोईटे व कुणाल शिरवाळे यांचे आभार मानले आहेत. तसेच श्रीगोंदा नगरपालिकेकडे विनंती करण्यात आली आहे की, मोकाट कुत्री आणि जनावरांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा यामुळे भविष्यात आणखी गंभीर प्रसंग उद्भवू शकतात.

स्रोत:(अधिकृत माहिती)
