#श्रीगोंदा.. टाकळीत अज्ञात रक्तपिपासू श्वापदांचा हैदोस.. – एका रात्रीत ३० कोंबड्या ठार, गावकऱ्यांत भीतीचे सावट…

श्रीगोंदा, दिनांक ११ मे २०२५:

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळी गावात अज्ञात श्वापदाच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिनांक ९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक शेतकरी संजय रणसिंग यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यावर अज्ञात आठ/दहा प्राण्यांनी हल्ला करून सुमारे २५ ते ३० कोंबड्यांचा जीव घेतला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहितीनुसार, हल्ला करणारे प्राणी दोन मोठे असून त्यांच्यासोबत पाच ते सात लहान पिल्लं होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हे प्राणी राखाडी रंगाचे असून कुत्र्यापेक्षा आकाराने मोठे आहेत. त्यांच्या अंगावर चट्टे- पट्टे दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ कोंबड्यांचे गळे चावत त्यांचे रक्त प्यायले असून, मांसाचा विशेष भाग खाल्ला नाही.

सदर हल्ला मागील दोन दिवसांपासून मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास घडतो आहे. गावकऱ्यांनी दगडफेक करून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला, मात्र प्राण्यांनी कोणतीही भीती दाखवली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेबाबत येथे चिंता व्यक्त केली जात आहे.

संजय रणसिंग यांनी याबाबत वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. उद्या सोमवारी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण टाकळी परिसरात श्वापदाच्या दहशतीचे सावट पसरले असून, वनविभागाने तातडीने शोध मोहीम राबवावी आणि संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

– स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading