दिनांक २२ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:
शहरातील मांडवगण रोडवर असलेल्या ‘संकल्प एस मार्ट’ या दुकानाला काल मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे १.३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
यात दुकानाचे शेड, आतील साहित्य आणि दिवाळीसाठी भरलेला लाखो रुपयांचा किराणा माल पूर्णपणे जळून खाक झाला. विशेष म्हणजे, घटनेची माहिती मिळूनही अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

माजी सैनिक नवनाथ खामकर आणि त्यांचे सहकारी मित्र तेजस धारकर यांच्या मालकीच्या या दुकानाला मध्यरात्री आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना व अग्निशमन दलाला संपर्क साधला. मात्र, सुरुवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

जवळपास एक तासाच्या विलंबानंतर अग्निशमन दल आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सकाळपर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु तोपर्यंत सर्वकाही जळून राख झाले होते.

देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर मेजर नवनाथ खामकर यांनी एक कोटी रुपये खर्च करून हे दुकान सुरू केले होते. दिवाळीच्या तोंडावर दुकानात सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा किराणा माल भरलेला होता. या घटनेत ते सर्व साहित्य जळून गेले आहे.

या घटनेमुळे मेजर खामकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या उशिरा प्रतिसादामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळी प्रशासनाचा निषेध केला.
यावेळी नागरिकांनी मेजर नवनाथ खामकर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत, प्रशासनाच्या या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या नुकसानीची भरपाई कशी होणार,? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
