श्रीगोंदा शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी कटिबद्ध : ॲड. सुशीलकुमार शिंदे..

श्रीगोंदा:-

आगामी श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक २ मधून ॲड. सुशीलकुमार शिंदे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून विकासाची कास धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका शिक्षक कुटुंबातून आलेल्या शिंदे यांनी, त्यांचे वडील स्व. गुलाबराव अण्णा शिंदे आणि आई यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार केला आहे.

ॲड.शिंदे यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्याचा गौरव केला. स्व. गुलाबराव अण्णा शिंदे यांनी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडवले, तसेच सोनवडी आणि गोपाळवाडी येथे आश्रमशाळा सुरू करून हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. त्यांची आई अजूनही ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. या सामाजिक कार्याचा आदर्श घेऊनच आपण जनतेची सेवा करणार असल्याचे ॲड. शिंदे यांनी सांगितले.

या राजकीय प्रवासात त्यांना अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, आणि संघर्ष योद्धा घनश्याम शेलार यांचा समावेश आहे.

महाविद्यालयीन जीवनात बबनराव पाचपुते यांनी त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बनवून राजकारण आणि समाजकारणाची ओळख करून दिली.

तसेच, राहुल जगताप यांनी प्रभाग क्रमांक २ ची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर विश्वास दाखवला, तर घनश्याम शेलार यांनी त्यांच्या संघर्षाची गाथा सांगून त्यांना प्रेरणा दिली.

आपण एका सर्वसामान्य घरातून आलो असल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणींची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, असे ॲड. शिंदे म्हणाले. “अडचणीच्या काळात नागरिकांनी दिवस असो वा रात्र, हक्काने कधीही एक कॉल करावा, मी सदैव त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

वकील आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी अनेक मित्र जोडले असून, त्यांची कामाची पद्धत अनेकांना परिचित आहे.

प्रभाग २ च्या विकासासाठी ॲड. शिंदे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. प्रभागातील अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, नियमित पाणीपुरवठा, वृक्षारोपण, आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा त्यांचा मानस आहे.

याव्यतिरिक्त, लहान मुलांसाठी प्रशस्त उद्याने तयार करणे, सर्वरोग निदान आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तसेच २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

एका सुशिक्षित आणि सामान्य कुटुंबातून आलेला तरुण म्हणून, प्रभाग २ मधील सर्व नागरिकांचा आशीर्वाद घेऊन आपण निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असल्याचे ॲड. सुशीलकुमार गुलाबराव शिंदे यांनी शेवटी माध्यमांना सांगितले.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading