श्रीगोंदा (ता. अहिल्यानगर), दि. २१ सप्टेंबर २०२५:
भाद्रपदातील बैलपोळा सण हा आनंद, हर्षोल्हासाने साजरा केला जातो. मात्र यंदा श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा सण सरकारला अनोखा संदेश देत साजरा केला. “कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करा” अशी ठाम मागणी करत त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या.

या वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्च दुप्पट वाढला, रोजंदारी दरही चढले, पण उत्पन्नाचे स्रोत जवळपास बंद झाले.

त्यातच जर्सी गाई, घोडे आणि भाकड जनावरे यांच्या देखभालीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर डोकेदुखी ठरत आहे. शेतमालाला भाव नाही, कर्जाचा बोजा वाढला, उत्पादन दिसत नाही – अशा संकटातून शेतकरी हवालदिल झाला आहे.

यात सर्वात वेगळं म्हणजे एका शेतकऱ्याने आपल्या गोठ्यातील जनावरांच्या अंगावर थेट शेतकऱ्यांच्या व्यथा रेखाटून सरकारला जाग करण्याचा संदेश दिला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात चर्चा रंगली.
स्रोत:(नाना शिंदे)

Advertise..
