दिनांक २१ सप्टेंबर २०२५:
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. आईचे छत्र हरवल्याने साधारण २ वर्षांपासून आत्याकडे राहत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीला तिच्याच २५ वर्षीय आतेभावाने लैंगिक शोषणाचे बळी ठरवले.

धक्कादायक बाब म्हणजे, या अत्याचारामुळे ती मुलगी गरोदर असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आतेभावाच्या घरी राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

तपासणीदरम्यान डॉक्टरांना ती गरोदर असल्याचे लक्षात आले. या गंभीर घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी विचारणा केली असता, ‘मला याबद्दल काहीही माहिती नाही,’ असे सांगून आरोपीने आपला गुन्हा नाकारला आहे. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत बाल लैंगिक अत्याचाराची ५ ते ६ प्रकरणे आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराची ४ ते ५ प्रकरणे समोर आली आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
