दिनांक २० फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
शहरातील जोधपूर मारुती चौक, नगर-दौंड बायपास आणि संत शेख महंमद बाबा दर्गा पटांगण येथे काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरभर ठिकठिकाणी व्याख्याने, कीर्तन, लहान मुलांसाठी वकृत्व स्पर्धा तसेच डीजे लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला होता.

या आनंदमय वातावरणात नगर-दौंड बायपासवर मात्र एक अनपेक्षित घटना घडली. डीजे लेझर शोवर नाचणाऱ्या तरुणांजवळून ऊसाने भरलेला ट्रेलर पलटी होण्याच्या अवस्थेत गेला. ट्रेलर अनियंत्रित होत गर्दीच्या दिशेने कलला मात्र थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने वाहन गर्दीपासून थोडक्या अंतरावर पलटी झाल्याने जीवितहानी झाली नाही. डीजेवर नाचणाऱ्या शिवप्रेमींना आणि उपस्थित कार्यकर्त्यांना यामुळे मोठा धक्का बसला.

घटनेनंतर तत्काळ पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे आणि पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

उस वाहतुकीतील हलगर्जीपणामुळे वाढते अपघात:
श्रीगोंदा तालुक्यात उस वाहतूक करणाऱ्या ट्रेलर्समुळे वारंवार अपघात घडत आहेत. मर्यादेपेक्षा जास्त ऊस भरून वाहतूक केली जात असल्याने अशा घटना घडत आहेत. स्थानिक प्रशासन आणि आरटीओ विभागाने यापूर्वी कॅम्प आयोजित करून कारखानदार आणि वाहनचालकांना योग्य सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही अनेक ट्रेलर चालक हे नियम धाब्यावर बसवून जास्त प्रमाणात ऊस वाहतूक करत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे.

शिवजयंतीचा उत्सव जल्लोषात पार पडला असला तरी या घटनेमुळे प्रशासन आणि नागरिकांना वाहतूक व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
