श्रीगोंदा, दिनांक २० फेब्रुवारी २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा शेजारी चव्हाण वस्ती जवळ नगर-दौंड रस्त्यावर काल दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:०० वाजता एक भीषण अपघात घडला. या अपघातात टू-व्हीलरवरून जात असलेल्या संतोष चोभे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्यांचा मुलगा सार्थक थोडक्यात बचावला असून, स्थानिकांनी तातडीने त्याला सुरक्षित ठिकाणी हलवले.

प्राप्त माहितीनुसार, टाटा Intra गाडीचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट चोभे यांच्या दुचाकीवर आदळली. यामुळे दुचाकीवरून खाली पडून संतोष चोभे गंभीर जखमी झाले व जागीच प्राण गमावले. अपघातानंतर टाटा Intra गाडीने पेट घेतला आणि ती संपूर्णपणे जळून खाक झाली. गाडीचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच आदिवासी पारधी संघटनेचे पदाधिकारी राहुल भोसले घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ पीडितांना मदत केली व स्थानिक प्रशासनाला घटनेबाबत कळवले. तसेच, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे आवाहन केले आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

