#श्रीगोंदा.. “महामानवांचा विचार जागवूया – संत रविदास ते छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य”: प्रा. सूर्यकांत भालेराव

श्रीगोंद्यात महामानव विचार प्रबोधन यात्रा – संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागविले

दिनांक १९ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंद्यात गेल्या तीन दिवसांपासून सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच आणि सत्यशोधक महिला संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव विचार प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने संत रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विचारवंतांचे मार्गदर्शन होत आहे. या कार्यक्रमाचा तिसरा दिवस काल उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ.रफिक सय्यद सर, प्राध्यापक सूर्यकांत भालेराव, ॲड. संभाजीराव बोरुडे, बाळासाहेब धोत्रे, डॉ. संतोष घोडके, रफिक इनामदार, कांतीलाल कोकाटे, अनिल ठवाळ, सौ.अनुराधा ठवाळ, सौ.मनीषा घोडके, सौ.रेश्मा घोडके, उमेश मखरे, सचिन झगडे, राजेंद्र पोकळे, अमीन भाई शेख, अमर घोडके, चंद्रनंदन ताडे, रावसाहेब घोडके, शिवाजी ताडे यांची उपस्थिती होती.

संत रविदासांचे विचार आणि सामाजिक समता

प्रमुख पाहुणे रफिक सय्यद सर यांनी आपल्या भाषणात संत रविदास यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “संत हे नेहमीच जगाच्या कल्याणासाठी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे बहुजनांचे कल्याण करणारे होते. मात्र, आज काही समाजविघातक प्रवृत्ती हिंदू-मुस्लिम समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत.” यावर त्यांनी संत रविदासांच्या वचनाचा दाखला देत स्पष्ट केले की, “जाती-जातीमे जात, हे जो केतन के पाद; रविदास पोरुष ना जुड सके, जब तक जाती न जात.!” म्हणजेच जातीभेद नष्ट झाल्याशिवाय खरी समता येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा इतिहास

प्रमुख वक्ते प्राध्यापक सूर्यकांत भालेराव यांनी संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा इतिहास उलगडला. “संत रविदासांनी समाजाला खोट्या व्यवस्थांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे “ब्राह्मण झूटा, वेद भी झूटे… झूटा ब्रह्मज्ञान!” या संत रविदासांच्या वचनाचा दाखला देत तत्कालीन व्यवस्थेवर प्रकाश टाकला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ५० हून अधिक मुस्लिम सैनिक असल्याचे सांगत, “शिवाजी महाराज कधीही धर्मभेद करत नव्हते, त्यांनी फक्त अन्यायावर वार केला,” असे स्पष्ट केले.

महापुरुषांचा जीवनसंघर्ष आणि समकालीन परिस्थिती

प्राध्यापक भालेराव यांनी बुद्ध, संत रविदास, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा संदर्भ देत समाजप्रबोधन केले.

त्यांनी पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख करत “रायराव पंडितांनी पुण्यावर गाढवाचा नागर फिरवला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेबांनी पुणे वसवले,” असे सांगितले. शिवाय, “शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जात नव्हते, मल्लम्मा यांचे उदाहरण त्यावर स्पष्ट पुरावा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्य रचना आणि ऐतिहासिक घटना

त्यांनी शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लिम योद्ध्यांची नावे सांगत इतिहासातील वास्तव मांडले. त्यामध्ये नूरखान बेग, दर्या सारंग, सिद्धी हलाल, मीर मोहम्मद, रुस्तमै जमाल, मदारी मेहतर अशा योद्ध्यांचा समावेश होता.

तसेच, अफजल खान वध, संभाजी कावजी, जीवा महाले, कृष्णजी भास्कर कुलकर्णी, बहिर्जी नाईक यांचाहि उल्लेख केला. तसेच, “छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका हा ऐतिहासिक सत्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे मनोगत

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. संगीता पावटे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “सद्यस्थितीत समाजाला महापुरुषांचे विचार समजून घेण्याची नितांत गरज आहे. संत, समाजसुधारक आणि राजे यांनी दिलेल्या शिकवणीचा विसर पडता कामा नये,” असे सांगितले.

प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक जागृती

या महामानव विचार प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून समाजाला इतिहासाची खरी जाण आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुकुंद सोनटक्के यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. प्रदीप खामगळ यांनी केले.

स्रोत:(विचार प्रबोधन यात्रा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading