#श्रीगोंदा.. संविधानाचे मूल्य जपण्यासाठी महामानवांच्या विचारांचा जागर – विचार प्रबोधन व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी अभ्यासपूर्ण विचार मांडणी..

दिनांक १८ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

शहरात आयोजित विचार प्रबोधन व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी मान्यवर वक्त्यांनी संविधान, सामाजिक समता आणि महापुरुषांच्या विचारधारांवर मार्मिक विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद सोनटक्के यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. प्रदीप खामगळ यांनी केले.

कार्यक्रमासाठी प्राध्यापक महबूब सय्यद हे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख वक्ते प्राध्यापक संदीप थोरात, तर अध्यक्षस्थानी ॲड. दिपाली बोरूडे होत्या.

संविधान हा देशाच्या प्रगतीचा मूलभूत दस्तऐवज – महबूब सय्यद

प्राध्यापक महबूब सय्यद यांनी संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत म्हटले की, “संविधान हा देशाच्या राज्यकारभाराचा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. पूर्वी कायदा धर्माच्या अधीन होता, परंतु संविधानामुळे सर्व नागरिकांना समान न्याय मिळू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय प्रक्रियेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, न्याय हा सर्वसामान्य जनतेसाठी असावा. राष्ट्रनिर्मिती भाषेवर नव्हे, तर लोकांच्या एकात्मतेवर अवलंबून असते.”

जात आणि धर्माच्या बंधनापलीकडे मानवता – प्रा.संदीप थोरात

प्राध्यापक संदीप थोरात यांनी आपल्या भाषणात संत रविदास यांचे दोहे उद्धृत करत समाजातील जात व्यवस्थेवर परखड विचार मांडले. “जात-पात ही माणसातील मनुष्यता संपवत आहे. संविधानाचे उद्दिष्ट जातीचा डाग नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित करणे आहे,” असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्व विशद करत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयत राज्याची आठवण करून दिली. “शिवरायांनी विखुरलेल्या जनतेला एकत्र करून ‘मावळा’ संबोधले, त्यामुळे जातीव्यवस्था नाहीशी झाली. शिवरायांच्या राज्याभिषेकाला धर्माने विरोध केला, यावरून स्पष्ट होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि राज्याभिषेक नाकारणाऱ्यांचा धर्म एक नाही.”

स्त्री-पुरुष समानता आणि संविधानाचे योगदान – ॲड. दिपाली बोरूडे

अध्यक्षीय भाषणात ॲड. दिपाली बोरूडे यांनी संविधान आणि महापुरुषांच्या विचारधारेतील समानता अधोरेखित केली. “महापुरुषांनी स्त्रियांवरील अन्याय आणि अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी लढा दिला. संविधानाने स्त्रियांना अधिकार दिले, आणि स्त्री-पुरुष समानता कायद्याने सुनिश्चित केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले की, “संविधान फक्त अधिकारांची जाणीव करून देत नाही, तर त्यासोबत कर्तव्यांचीही आठवण करून देते. समाजातील वंचित, पीडित घटकांनी संविधानाच्या मदतीने आपली प्रगती साधावी.”

या व्याख्यानमालेस श्रीगोंदा आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ॲड. संभाजी बोरूडे, मुकुंद सोनटक्के, ॲड. प्रदीप खामगळ, राजेंद्र पोकळे, बापू माने, रमेश मखरे, संदीप उमाप, बबन दांडेकर, सचिन झगडे, रावसाहेब घोडके, शिवाजी नवले, शिवा ताडे, रेवन आप्पा घोडके, अमोल डाळिंबे, विनोद उजागरे, उमेश मखरे, देवयानी घोडके, मीना नवले, राम नवले, वामन भदे यांच्यासह अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

स्रोत:(व्याख्यानमाला दुसरा दिवस)

उपस्थित जनसमुदाय

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading