अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल!

दिनांक ३१ जुलै २०२५ श्रीगोंदा (प्रतिनिधी):

तालुक्यातील एका गावात घडलेल्या धक्कादायक प्रकारात एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भा.दं.वि. कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना 30 जुलै 2025 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली असून संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी असताना अचानक बेपत्ता झाली. पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही न मिळाल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संजय वाघमारे हे या प्रकरणाचा तपास करत असून, पोलीस पथक अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास करत आहे.

सदर मुलगी केवळ १३ वर्षे वयाची असून, अज्ञात व्यक्तीने तिला कोणत्यातरी आमिषाने फुस लावून अनोळखी ठिकाणी नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, तपासाला वेग देण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply