दिनांक १६ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या विकास कामांवर स्थानिक नागरिक आणि विशेषतः मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. श्रीगोंदा नगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी अत्यंत मोजकीच कामे केली असून, त्यात केवळ कब्रस्तान वगळता आजपर्यंत कोणतेही लक्षणीय विकासकाम नगरसेवकांनी किंवा पालिका प्रशासनाने केलेले नाही, अशी तीव्र नाराजी सामाजिक कार्यकर्ते जहीर जकाते यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

जहीर जकाते यांनी श्रीगोंदा शहरातील जबाबदार सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना, श्रीगोंदा नगरपालिकेच्या विकास निधीमध्ये शहरातील मुस्लिम आणि मागासवर्गीय समाज बांधवांना विचारात घेतले जात नसल्याचे ठळकपणे निदर्शनास आणले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ कब्रस्तान आणि ईदगाह वगळता मुस्लिम समाज आणि समाजाच्या मुलांसाठी शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित कामांबाबत नगरपालिका प्रशासनासह आत्तापर्यंतचे नगरसेवक उदासीन राहिले आहेत.

जकाते यांनी स्पष्ट केले की, मुस्लिम व मागासवर्गीय समाज बहुलक्षेत्रात रस्ते, पाणी, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणीवपूर्वक ठेवला जातोय, ही बाब नवीन नाही. त्यांनी जगाचे आणि देशाचे आयडॉल असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने सायन्स लॅब बनवावी, अशी महत्त्वपूर्ण मागणीही यावेळी केली.

सध्याची वॉर्ड रचना, प्रभाग रचना आणि नपा निवडणूक प्रक्रिया पाहता, सर्व प्रशासकीय व्यवस्था मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व पुढे येणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे निदर्शनास येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तसेच, श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनात लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नसल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. श्रीगोंदा नगरपालिकेच्या या उदासीन धोरणांमुळे समाजाच्या मूलभूत गरजांकडे आणि विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जहीर जकाते यांनी व्यक्त केली आहे.
स्रोत:(जहीर जकाते यांच्या मुलाखतीवरून)
