दिनांक १५ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:
आगामी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार (सर्वसामान्य खुला प्रवर्ग) मध्ये उद्योगपती सुनील ढवळे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. विशेषतः सर्वसामान्य, मागासवर्गीय, बहुजन आणि अल्पसंख्यांक बांधवांकडून त्यांना पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. ढवळे यांनी भेटीदरम्यान माध्यमांशी संवाद साधत आगामी निवडणूक आणि प्रभागाच्या विकासासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.

‘समाजकारणासाठी राजकारण’…
सुनील ढवळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ते सामान्यांचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शासकीय पाठबळ घेऊन सोडवण्यासाठी, स्थानिक तरुणांमध्ये उद्योग निर्मितीसाठी आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत.

बहुतांश मागासवर्गीय मतदारांसाठी विकसनशील योजना राबवणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि जनकल्याण योजनांवर त्यांचा भर असेल. ढवळे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून, ते शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. सामान्य मतदार केंद्रभूत ठेवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांसह विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी येथे व्यक्त केले आहे.

शैक्षणिक प्रगती आणि व्यसनमुक्तीवर लक्ष
प्रभागातील मुलांची शैक्षणिक प्रगती, व्यसनाधीन तरुणांची व्यसनमुक्ती करून त्यांना व्यावसायिक दृष्टिकोन देणे आणि उद्योगांसाठी तयार करणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकास कामांना चालना देऊन, सर्वसमावेशक योजना आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत, सामान्यांच्या ऋणात राहण्यासाठी ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ढवळे यांनी स्थानिक नागरिकांशी त्यांचे असलेले ऋणानुबंधाचे संबंध अधोरेखित केले. “त्यांच्या संधीचे सोने करणे आणि प्रभागाचा विकास करणे एवढाच माझा ध्यास असणार आहे,” असे ते म्हणाले. “प्रस्थापितांसारखे अर्थकरणासाठी राजकारण न करता, समाजकारणासाठी राजकारण करणार आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. माझा मागासवर्गीय, बहुजन आणि सर्वसामान्य समाज बांधव व महिला भगिनींचे तसेच तरुणांचे काम केंद्रभूत असणार असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रभागातील मूलभूत सुविधा आणि विकासासाठी येथील स्थानिक जबाबदार नागरिकांची समिती बनवून, पारदर्शक आणि सर्वांच्या हिताची कामे करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सुनील ढवळे यांनी जाहीर केले. “मी नगरसेवक झाल्यास नमूद समितीतील प्रत्येक सदस्य सार्वत्रिक विकास कामांसाठी नगरसेवक म्हणूनच जबाबदारी पार पाडील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्रोत:(मुलाखत आणि सामान्य जनतेची चर्चा)
