दिनांक १६ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा:
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कारखान्याने गेल्या गाळप हंगामात (सन २०२४-२०२५) गाळप केलेल्या ऊस बिलापोटीचा दुसरा हप्ता २०२ रु. प्रति टन प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला आहे.

याशिवाय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळपाच्या प्रमाणात १० ते १०० किलो साखर मोफत देऊन त्यांच्या दिवाळीच्या आनंदात भर घातली आहे. अशी माहिती गौरी शुगर कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी दिली.

ओमराजे बोत्रेपाटील यांनी पुढे सांगितले की, गौरी शुगरने सन २०२३-२०२४ या गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाला ३००६ रु. अंतिम भाव दिला होता. तसेच, सन २०२४-२०२५ मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रतिटन ३१०१ रु. भाव देण्याचे धोरण कारखान्याने निश्चित केले आहे.

ओंकार ग्रुपची स्थापना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव आणि कामगारांना आर्थिक न्याय देण्याच्या भावनेने करण्यात आली आहे. आज ओंकार ग्रुपचे १६ साखर कारखाने झाले आहेत.

या यशात साखर व्यवसायातील अधिकारी, कामगार तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांचे मोठे योगदान आहे. ओंकार ग्रुपची साखर व्यवसायात कुणाशीही स्पर्धा नसून, ऊसाला चांगला भाव देणे आणि त्यासाठी काटकसरीने कारभार करणे, एवढेच धोरण असल्याचे बोत्रेपाटील यांनी स्पष्ट केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
