श्रीगोंदा तालुक्यात ११ लाखांच्या मुद्देमालासह रस्ता लुटणारी टोळी जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची यशस्वी कारवाई…

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा/अहिल्यानगर:

श्रीगोंदा तालुक्यात वडाळी रस्त्यावर सशस्त्र दरोडा टाकून नागरिकांना लुटणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ११,१०,०००/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी कार्तिक सचिन मिसाळ (वय २०, रा. खेडकर मळा, श्रीगोंदा) हे वडाळी रोडवरील लोखंडे मळ्याच्या टेकडीवरून जात असताना, एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीने त्यांना आडवे गाठले. आरोपींनी गुप्तीचा धाक दाखवून फिर्यादीकडील २,८०,०००/- रुपये किमतीचे ३७.५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल जबरदस्तीने चोरून नेले होते.

या घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), १२६ (२), ११५ (२) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना समांतर तपास करून गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले.

पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी तातडीने रमेश गांगर्ड, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे, आणि चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन घेतले, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण केले. या आधारावर, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी हा गुन्हा प्रथमेश शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस पथकाला आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या कारने पारगांव फाटा, श्रीगोंदा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोन कार अडवल्या आणि कारमधील तीन इसमांना ताब्यात घेतले.

त्यांनी त्यांची नावे अनिकेत गोरख उकांडे (वय-२६, रा. अकोळनेर), २) प्रथमेश शिवनाथ शिंदे (वय २२, रा. शिवाजी चौक, श्रीगोंदा) आणि ३) विजय शहाजी देशमुख (वय-३०, रा. नळवणे, जि. पुणे) अशी सांगितली.

गुन्ह्याबाबत कसून चौकशी केल्यावर प्रथमेश शिवनाथ शिंदे याने कबुली दिली की, हा गुन्हा त्याने त्याची मैत्रिण ४) मयुरी आनंदा पाटील (रा. नातोशी, जि. सातारा), ५) बंडू उर्फ सागर भीमराव साळवे (रा. बाबुर्डी बेद) आणि ६) प्रतीक धावडे (रा. तांदळी दु, श्रीगोंदा) यांच्या मदतीने केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल फोन, आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेल्या दोन कार (वाहने) असा एकूण ११,१०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading